मुंबईतील सिनेमा थिएटर व मॉलमध्ये पिण्याच्या पाण्यावर लुट थांबवण्याची मागणी

मुंबईतील सिनेमा थिएटर आणि मॉलमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या अवाजवी दरांविरोधात शिवसेनेने आवाज उठवला असून नागरिकांसाठी मोफत व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Feb 6, 2026 - 19:14
 0  292
मुंबईतील सिनेमा थिएटर व मॉलमध्ये पिण्याच्या पाण्यावर लुट थांबवण्याची मागणी
शिवसेनेचे राज्य संघटक विलास हरीभाऊ रुपवते यांनी मुंबईतील सिनेमा थिएटर व मॉलमध्ये मोफत पिण्याच्या पाण्याची मागणी करत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करतानाचा क्षण.

मुंबई शहरातील सिनेमा थिएटर व मॉलमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अवाजवी दर मोजावे लागत असल्याचा गंभीर मुद्दा शिवसेनेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. शिवसेनेचे राज्य संघटक विलास हरीभाऊ रुपवते यांनी याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत, सार्वजनिक ठिकाणी मोफत व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची ठोस मागणी केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक नागरिकाला पाणी पिण्याचा हक्क दिला असून पाणी ही जीवनावश्यक गरज आहे. मात्र सध्या मुंबईतील अनेक सिनेमा थिएटरमध्ये अर्धा लिटर पाण्याची बाटली ८० ते १०० रुपयांना विकली जात आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य प्रेक्षकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रेल्वे स्थानक, बस स्थानक, हॉटेल्स व इतर सार्वजनिक ठिकाणी मोफत पाणी देण्याची व्यवस्था असताना, थिएटर व मॉलमध्ये मात्र ही सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. विशेषतः चित्रपट पाहताना नागरिकांना बाहेरून पाणी नेण्यास मज्जाव केला जातो, यामुळे त्यांना नाईलाजाने महागडे पाणी खरेदी करावे लागते.

शिवसेनेने प्रशासनाकडे मागणी केली आहे की, सिनेमा थिएटर व मॉल मालकांना सक्तीचे आदेश देऊन स्वच्छ व मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. अन्यथा नागरिकांच्या पाण्याच्या हक्कासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

या मागणीमुळे मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow