मुंबईकरांना समान घर हक्क द्या – विलास रूपवते यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठाम मागणी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे राज्य संघटक विलास रूपवते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व झोपडपट्टीतील नागरिकांना 500 चौ.फुट घर देण्याची आणि समान हक्क देण्याची मागणी केली.
मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्य संघटक श्री. विलास रूपवते यांनी सर्व मुंबईकरांसाठी समान हक्काची जोरदार मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन स्पष्ट सांगितले की — “धारावीतील नागरिकांना जसे 500 चौ.फुटांचे घर मिळणार आहे, तसेच घर सर्व झोपडपट्टीत राहणाऱ्या मुंबईकरांनाही मिळाले पाहिजे.”
अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. या वेळी त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाबाई आणि मेहनती कामगार वर्गावर स्तुतीचा वर्षाव केला. मात्र, त्याच वेळी धारावीच्या नागरिकांसाठी 500 चौ.फुटांच्या घराची घोषणा करून सरकारने फक्त एका भागातील लोकांना लाभ दिला, अशी टीका विलास रूपवते यांनी केली.
“जर सरकारला खरंच मागासवर्गीय आणि कष्टकरी वर्गावर प्रेम असेल, तर धारावीप्रमाणेच माता रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर आणि मुंबईतील सर्व झोपडपट्टीतील नागरिकांनाही 500 चौ.फुटांचे घर द्यावे. हेच समानतेचे आणि न्यायाचे खरे उदाहरण ठरेल,”
असे ठाम विधान विलास रूपवते यांनी केले.
त्यांनी पुढे म्हटले की, महायुती सरकार फक्त व्यापारी घराण्यांना – विशेषतः आदाणी समूहाला – फायदा होईल अशा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत आहे, असे दिसत आहे. ही भूमिका मुंबईतील गरीब, झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांवर अन्याय करणारी आहे.
विलास रूपवते यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर सरकारने समान हक्क दिले नाहीत, तर येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत माता रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर आणि सर्व झोपडपट्टीतील जनता महायुती सरकारला योग्य उत्तर देईल.
त्यांनी सांगितले —
“हे फक्त घराचे प्रश्न नाही, हा सन्मानाचा आणि समानतेचा प्रश्न आहे. धारावीला 500 चौ.फुट घर मिळत असेल, तर प्रत्येक मुंबईकराला मिळालं पाहिजे.”
मुंबईतील झोपडपट्टी भागात विलास रूपवते यांच्या या मागणीला मोठा प्रतिसाद मिळत असून, समान हक्काच्या लढ्याला आता सर्वसामान्य मुंबईकरांचा पाठिंबा मिळत आहे.
What's Your Reaction?