निराधार व देवदासी महिलांची मंत्रालयाबाहेर तीव्र निदर्शने : बांगड्या फोडून सरकारचा निषेध
वारंवार निवेदने देऊनही मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र निराधार व देवदासी महिला संघटनेच्या वतीने मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर बांगड्या फोडून तीव्र आंदोलन करण्यात आले.
आंदोलने आणि मोर्चे काढूनही शासन दरबारी उपेक्षित राहिलेल्या निराधार व देवदासी महिलांनी आज महाराष्ट्र निराधार व देवदासी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाबाहेर तीव्र निदर्शने केली. यावेळी संतप्त महिलांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर हातातील बांगड्या फोडून आणि साड्या फेकून सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला.
विधवा, देवदासी आणि निराधार महिलांना समाजात मानाने जगता यावे यासाठी संघटनेच्या वतीने दरमहा २ हजार रुपये पेन्शन, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत कायमस्वरूपी साहाय्य आणि पिवळे रेशनकार्ड देण्याची मागणी करण्यात आली होती.
आंदोलकांनी मंत्रालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून आंदोलकांना रोखले. मात्र महिलांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडून शासनाला आपल्या संतापाची जाणीव करून दिली.

ऐतिहासिक संदर्भ : दैनिक लोकमत (६ एप्रिल २०१०)
What's Your Reaction?