दुर्बल घटकांसाठी घोषणांचा वर्षाव; मुलींच्या लग्नासाठीही भरघोस मदत मिळणार
मुंबईतील सोमय्या मैदानावर आयोजित दुर्बल घटक मेळाव्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून घोषणांचा वर्षाव; विलास रूपवते यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक मेळाव्यानंतर देवदासी मानधन, मुलींच्या विवाहासाठी भरघोस मदत व शिक्षणात सवलती जाहीर.
मुंबई : भ्रष्टाचाराची एकामागोमाग एक निघणारी प्रकरणे, मीडियाच्या पाठिंब्याने जागतिक पातळीवर गाजलेल्या अण्णांच्या उपोषणाने हवालदिल झालेल्या काँग्रेसने रविवारी मुंबईतील सोमय्या मैदानावर आयोजित केलेल्या दुर्बल घटक मेळाव्यात दुर्बल घटकातील लोकांसाठी घोषणांचा वर्षाव केला. अत्यंत गरीब वर्गातील सुमारे ५० ते ६० हजार महिलांनी या मेळाव्याला हजेरी लावल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच काँग्रेस पक्षाचे धोरण हे समाजातील तळागाळातील लोकांसाठीच असून सरकारने त्यानुसारच योजना बनविल्या असल्याचे सांगितले. यापूर्वी देवदासी महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रतिमाह ६०० रुपये सरकारतर्फे दिले जात होते. आता राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे त्यात आणखी ६०० रुपयांची भर टाकून त्यांना प्रतिमाह १२०० रुपये दिले जातील, अशी घोषणा करताच हजारो महिलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. देवदासी वा त्यांच्या मुलींच्या लग्नासाठीची रक्कम १० हजारांवरून वाढवून २५ हजार तसेच पदवीधर मुलींच्या लग्नासाठी ५० हजार रुपये अनुदानाची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
खासगी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणासाठी कटिबद्ध
दुर्बल घटकांतील मुलांसाठी शालेय गणवेश तसेच प्रवेश फीसाठी दिली जाणारी ३७० रुपयांची रक्कम वाढवून मुलांसाठी १६०० व मुलींसाठी १७०० रुपये केली जाणार आहे. तसेच खासगी शाळांमध्ये दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा व त्यासाठी २५ टक्के जागा राखून ठेवाव्यात यासाठीही सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी स्वच्छतागृहे, शाळा आदी गोष्टींसाठी सरकार मोठ्या योजना घेऊन येत असल्याचे सूतोवाचही मुख्यमंत्र्यांनी केले.
तसेच दुर्बल घटकांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीस स्व. लताताई सकट यांच्या नावे शासनातर्फे एक लाख रुपयांचा पुरस्कार व दोन संस्थांना ५० हजार रुपयांचा पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री चव्हाण यांनी केली. या मेळाव्यात खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी लिहिलेल्या ‘शिदोरी समतेची १०५ विषयांची’ या पुस्तिकेचे विमोचन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यात अपंगांच्या रिक्त असलेल्या ३२०० जागा भरण्यात येतील, पुणे येथे अपंगांसाठीचे आयुक्तालय उभारण्यात येईल, अशा घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मेळाव्यात केल्या. तोच धागा पकडून सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारप्रमाणेच सहकारी क्षेत्रातही अपंगांना ३ टक्के राखीव जागा ठेवण्यात येतील, अशी घोषणा केली.
विलास रूपवतेंना मिळणार आमदारकी?
देवदासी व दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या विलास रूपवते यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून हा मेळावा यशस्वी करून दाखविला. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वात त्यांचे वजन चांगलेच वाढले असून रूपवते यांना हुसेन दलवाई यांची विधान परिषदेची जागा देण्यात यावी, असा विचार सुरू झाल्याचे समजते. मात्र त्यामुळे अनेक इच्छुकांत नाराजी पसरली आहे.
मूळ वृत्त संदर्भ / Original Article Link:
https://divyamarathi.bhaskar.com/news/mah-mum-congress-and-poor-people-2459531.html
What's Your Reaction?